स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग बांधवांच्या तपासणी व प्रमाणीकरणासाठी आलेल्या नागरिकांना डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे प्रचंड नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. वैद्यकीय अधिकारी व संबंधित कर्मचारी वेळेवर उपस्थित नसल्याने दूरवरून आलेल्या दिव्यांग बांधवांची मोठी गैरसोय झाली. या गंभीर प्रकाराची दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सकांनी निष्काळजीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईची तंबी दिली आहे.
मलकापूर व परिसरातील ग्रामीण भागातून अनेक दिव्यांग बांधव प्रमाणपत्र तसेच नियमित वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आले होते. मात्र, निश्चित वेळेत संबंधित डॉक्टर आणि कर्मचारी आपापल्या कक्षात हजर नव्हते. तासंनतास ताटकळत राहावे लागल्याने दिव्यांग बांधव आणि त्यांच्या नातेवाइकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
या अनास्थेविरोधात स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेतली. रुग्णालयातील ढिसाळ कारभाराबाबत थेट बुलढाणा येथील जिल्हा शल्यचिकित्सकांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात आले व दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
या घटनेची गांभीर्याने दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सकांनी स्पष्ट केले की, रुग्णांची विशेषतः दिव्यांग बांधवांची अडवणूक किंवा दुर्लक्ष खपवून घेतले जाणार नाही. रुग्णालयात वेळेवर उपस्थित न राहणाऱ्या आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई केली जाईल, असा कडक इशारा त्यांनी दिला आहे.